५ जुलैपर्यंत विजांच्या कडकडाट, वादळी वारासह पावसाची शक्यता*
*प्रशासनाकडून सुरक्षेच्या उपाययोजना जारी*
यवतमाळ, दि.१ : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात दि.१ ते ५ जुलै या कलावधीत काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. या दरम्यान होणारी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना जारी केल्या असून त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वादळी वारा, विजा चमकत असतांना घरात असल्यास घराच्या खिडक्या व दरवाजा बंद ठेवा. दरवाजे, खिडक्या, कुंपणापासून दुर राहा. मेघगर्जना झाल्यापासून ३० मिनिटे घराच्या आतच रहावे. घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित निवा-याच्या ठिकाणाकडे मजबूत इमारतीकडे प्रस्थान करावे. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहा. गाडी चालवीत असल्यास, सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न करा.
उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये झाकावे. जमीनीशी कमीत कमी संपर्क असावा. मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारांपासून दूर रहा. जंगलामध्ये असल्यास दाट, लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावा. इतर खुल्या जागेवर असल्यास दरीसारख्या सुरक्षित खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा.
वीज पडल्यास, वज्राघात झाल्यास त्वरीत रुग्णवाहिका व वैद्यकिय मदत बोलवा. वज्राघात बाधित व्यक्तिस त्वरीत वैद्यकीय मदत मिळवून द्या. त्याला हात लावण्यास धोका नाही. ओल्या व थंड परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमिनीच्यामध्ये संरक्षणात्मक थर ठेवावा जेणेकरून हायपोथेरमीयाचा धोका कमी होईल. इजा झालेल्या इसमास हाताळतांना श्वसन बंद असल्यास तोंडावाटे पुनरुत्थान प्रक्रिया अवलंबवावी. हृदयाचे ठोके बंद असल्यास कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदयगती सीपीआर करुन सुरु ठेवावी.
गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, समुद्र किनारी, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस, सहलीची आश्रय स्थाने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्यादी ठिकाणे टाळावेत. घरात असल्यास वायरद्वारे जोडले गेलेले फोन, मोबाइल व इतर इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये.
गडगडीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नका. या दरम्यान आंघोळ, हात, भांडी, कपडे धुणे ही कार्ये करु नयेत. कॉक्रीटच्या जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहू नये. प्रवाहकीय पृष्ठभागांशी संपर्क टाळावा जसे घातूची दारे, खिडक्यांची तावदाने, वायरींग व इलेक्ट्रीक मिटर. घराबाहेर असल्यास मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नका. वाहनांच्या धातू किंवा वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, अधांतरी लटकणा-या, लोंबणा-या तारांपासून लांब रहा.
वादळी वारामुळे होणारे नुकसान टाळण्याकरीता वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस येत असल्यास तत्काळ सुरक्षितस्थळी पोहचून आश्रय घ्यावा, शक्यतो मोठ्या झाडांचा, टिनपत्रे असलेल्या शेडचा, जिर्ण इमारतीचा आश्रय घेऊ नये. शेतात असल्यास पावसाचा अंदाज, आभाळ असल्यास तत्काळ घराकडे प्रस्थान करावे किंवा मजबूत अशा सुरक्षितस्थळाचा आश्रय घ्यावा.
वाहन चालवित असल्यास तत्काळ सुरक्षितस्थळी आश्रय घेऊन स्वतः जवळील मोबाईल बंद करावा, जेणे करून आपल्याकडे विज आकर्षित होणार नाही. विजेच्या वस्तुंशी संपर्क ठेवू नये व त्यापासून दुर रहावे. वादळी पाऊस व विजांचा कडकडाट सुरु असल्यास अशावेळी घरातच राहावे. घर सुरक्षित करुन आवश्यक दुरुस्ती करावयाची असल्यास ती करुन घ्यावी. विशेषतः छत दुरूस्ती करून घ्यावी, तीक्ष्ण वस्तू सैल सोडू नयेत.
आपल्या सभोवताल असलेली किडलेली झाडे, तुटलेल्या फांद्या काढून टाकाव्यात जेणेकरुन विज पडून किंवा वादळ वा-यापुर्वी झाडे पडून नुकसान होणार नाही. या कालावधीत सर्व विद्युत उपकरणे अनप्लग करुन घ्यावे तसेच टिनपत्रे व मेटल शिट असलेल्या वस्तुंपासून दुर रहावे. झाडांच्या जवळ किंवा झाडा खाली आसरा घेऊ नये, वादळाने नुकसान झालेल्या भागापासून, घरापासून दूर राहावे. पडलेल्या झाडापासून, पडलेल्या विज तारांपासुन दुर रहावे.
हवामान खात्याने दिलेल्या ईशारामुळे शेतामध्ये पिक काढणीस आलेले असल्यास पिकांची तत्काळ काढणी करून घ्यावी. कृषि उत्पन्न बाजार समिती येथे विक्रीस ठेवलेले धान्य विक्रीस वेळ असल्यास ताडपत्री आच्छादून सुरक्षित ठेवावे, जेणे करून गारपिट किंवा वादळी पाऊस आल्यास धान्याची नासाडी होणार नाही, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
५ जुलैपर्यंत विजांच्या कडकडाट, वादळी वारासह पावसाची शक्यता
Bhagirath Raja 24 News.com
0




إرسال تعليق