बालकांविषयी कायद्यामध्ये शिक्षकांची भुमिका याबाबत कायदेविषयक शिबीर
यवतमाळ, दि.7 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा महिला व बालविकास विभाग आणि ग्रामिण समस्या मुक्ती ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा संवाद अभियानांतर्गत बालकांविषयी कायद्यामध्ये शिक्षकांची भुमिका याविषयावर बळीराजा चेतना भवन येथे जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यकमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर होते. प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून दिशा संस्थेचे अध्यक्ष प्रविण खांडपासोळे, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजश्री राऊत उपस्थित होते.
यावेळी न्या.न्हावकर यांनी विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यासाठी प्रत्येक घटकांची जबाबदारी आहे. महिला व बालकांवर घटना का घडतात. तर माहितीचा प्रभाव अतिशय वेगवान आहे, त्याचा प्रभाव खुप आहे, त्याचा मुलांवर सुध्दा परिणाम होतात. याबाबत पालक व शिक्षकांना सुध्दा लक्षात येत नाही. समाजात महिलांबद्दलची ठराविक घटकाची समज चुकीची आहे. महिला म्हणजे उपभोगाचे साधन समजत असल्यामुळे या घटना घडत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रिला माता समजले जाते. प्रथम आईचा आदर करावा,असे सांगितले.
कार्यक्रमाचे वक्ते श्री.खांडपासोळे यांनी बाल न्याय अधिनियमामध्ये सुधारणा होवून २०२१ चा कायदा आल्याचे सांगितले. आजच्या युगामध्ये आईवडीलांनी मुख्यत्वे ६ ते १२ वयोगटातील मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या वयातील मुले शाळेमध्ये शिक्षकांच्या सानिध्यात जास्त वेळ असतात. त्यामुळे शिक्षकांची किशोरवयीन मुलांमुलींमध्ये होणारे बदल, त्याअनुषंगाने येणाऱ्या समस्या, अडचणी आणि त्या कशाप्रकारे हाताळण्यात यावेत, याबाबत मार्गदर्शन केले.
मुलामुलींविरूध्द होणाऱ्या शारिरीक, मानसिक आणि लैगिंक अपराधापासून स्वरक्षणार्थ किशोरवयीन मुले व्यक्तीशः, कुंटुंब व्यवस्था आणि सामाजिक स्तरावर काय उपाययोजना करू शकतात याबाबत शिक्षकांसोबत त्यांनी संवाद साधला. मुलामुलींना स्वरक्षणार्थ आयुष्याच्या प्रत्येक कठीण प्रसंगी जाणीव, जागृती व जबाबदारी या त्रिसूत्रीचे अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुलांवर अंमली पदार्थांसह कोणताही वाईट परिणाम होणार नाही, याबाबत शिक्षकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मुले संकटात सापडल्यास त्यांनी पोलिस हेल्पलाईन नंबर ११२ तसेच चाईल्ड लाईन नंबर १०९८ वर संपर्क करण्याबाबत माहिती दिली.
सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल पुरी यांनी सायबर सेक्युरीटी संदर्भात शिक्षकांसोबत हितगुज केली. स्मार्ट फोन वापरण्यासाठी लोकांनी आधी स्वतः स्मार्ट बनावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच स्मार्ट फोन वापरतांना घ्यावयाच्या काळजी संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राधिकरणाचे सचिव के.ए. नहार यांनी केले. संचलन शिक्षक चंद्रबोधी घायवटे यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी राजु मडावी यांनी केले. यावेळी यवतमाळ तालुक्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक संवाद शिबीरास उपस्थित होते.
बालकांविषयी कायद्यामध्ये शिक्षकांची भुमिका याबाबत कायदेविषयक शिबीर
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा