*राळेगावची बदनामी थांबवा* ; *मानवी* *तस्करीच्या आरोपांनी तालुका हादरला* , पत्रकारांचा 'तथ्य' मांडण्याचा निर्धार
( राळेगाव येथे दोन्ही पत्रकार संघटनेच्या संयुक्त सभेतील सुर)
राळेगाव (प्रतिनिधी):
गेल्या काही दिवसांपासून राळेगाव तालुक्यात 'मानवी तस्करी' आणि 'मुलींची विक्री' होत असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत असल्याने तालुक्यात भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाने शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध अशी ओळख असलेल्या राळेगाव तालुक्याची नाहक बदनामी होत असल्याचा सूर उमटत आहे. या पार्श्वभूमीवर, गावची प्रतिमा मलिन होऊ नये आणि सत्य समोर यावे, या उद्देशाने तालुका पत्रकार संघटनेची संयुक्त बैठक शनिवार (दि. २५) रोजी सा. आत्मबल कार्यालय येथे पार पडली.
तथ्यहीन वृत्तांकन टाळण्याचे आवाहन करण्यात आले .
या बैठकीत तालुक्यातील प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व प्रतिनिधींनी उपस्थित राहून सध्याच्या परिस्थितीवर साधक-बाधक चर्चा केली.
"राळेगाव तालुका हा सीतामातेच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. अशा पवित्र भूमीवर मानवी तस्करीसारखे गंभीर आरोप होणे दुर्दैवी आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. गावाचे नाव राज्यात खराब होत असून, राज्यातील पत्रकार बांधवांनी या गावचा पूर्वेतिहास तथ्य तपासूनच वृत्तांकन करावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
राळेगाव तालुक्याची ओळख ही देशात आणि जगात महत्त्वाची आहे. या भूमीच्या संस्कृतीला आणि परंपरेला चुकीच्या आरोपांनी नख लावण्याचे काम सुरू असून ते थांबवणे गरजेचे आहे.
आरोप-प्रत्यारोपांमुळे सर्वसामान्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची शहानिशा करून सत्य जनतेसमोर आणावे.
पत्रकारांचा ठाम विश्वास
"आमच्या पिढ्यानपिढ्या या मातीत वाढल्या आहेत, हा परिसर असा कधीच नव्हता आणि नसेल," असा ठाम विश्वास उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केला. राळेगावची शांतता आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सर्व पत्रकारांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी केला.
या बैठकीला तालुक्यातील दोन्ही पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आणि तरुण प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्याची अस्मिता वाचवण्यासाठी पत्रकार संघ आता सक्रिय झाला असून, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात एकत्र उभे राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा