रिमोटद्वारे इलेक्ट्रिक वजनकाट्यात फेरफार करून कापूस खरेदीत फसवणूक – अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; १४ आरोपी अटक
आर्णी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना जास्त दराचे आमिष दाखवून इलेक्ट्रिक वजनकाट्यात रिमोटच्या साहाय्याने फेरफार करत कापूस खरेदीत मोठी फसवणूक करणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा आर्णी पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या कारवाईत तब्बल १४ आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
ग्राम अंबोडा (ता. आर्णी) येथे दिनांक ११ मार्च २०२६ पासून बार्शी टाकळी (जि. अकोला) येथील काही व्यापारी शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा प्रति क्विंटल सुमारे २०० रुपये अधिक दर देण्याचे आमिष दाखवत कापूस खरेदी करत होते.
दरम्यान, १८ मार्च २०२६ रोजी रमेश देविसिंग राठोड यांच्या घरी कापूस खरेदी सुरू असताना मोठ्या गाठोड्यांचे वजन अपेक्षेपेक्षा कमी येत असल्याने संशय निर्माण झाला. यावेळी कापूस मोजणाऱ्या इसमाकडे भुरकट रंगाचा रिमोट दिसून आला. संशय बळावल्याने तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक दुर्योधन राठोड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचासमक्ष वजनकाट्याची तपासणी केली असता रिमोटच्या सहाय्याने वजन कमी दाखवले जात असल्याचे उघड झाले.
या प्रकारात दिलीप घोरपडे यांचा अंदाजे ९०० किलो (₹६५,७००) व फिर्यादी रमेश राठोड यांचा सुमारे ५०० किलो (₹३६,८००) कापूस कमी दाखवून एकूण ₹१,०२,५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. तसेच ११ मार्चपासून गावातील इतर शेतकऱ्यांनाही अशाच पद्धतीने गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी तातडीने कारवाई करत बार्शी टाकळी येथील या टोळीतील १४ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून वाहन, इलेक्ट्रिक वजनकाटा, रिमोट व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणी रमेश देविसिंग राठोड यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा क्र. २६७/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या नेतृत्वात पार पडली.
🔴 शेतकऱ्यांना आवाहन : कापूस विक्री करताना वजनकाट्याची खात्री करूनच व्यवहार करावा, अनोळखी व्यापाऱ्यांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा