जवळा गावात श्रीरामनवमी उत्सवात भक्तांची उसळलेली गर्दी; धार्मिक वातावरणात जल्लोष

जवळा (ता. आर्णी) :
श्रीरामनवमी जन्मोत्सवानिमित्त जवळा गावात धार्मिक उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते. भगवान श्रीराम यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधत गावातील मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान श्रीराम तसेच श्री अप्पा स्वामी महाराज यांचे दर्शन घेत पूजा-अर्चना केली.

उत्सवाच्या निमित्ताने गावात भक्तांची लक्षणीय गर्दी उसळली होती. जवळा तसेच परिसरातील गावांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दाखल झाले होते. मंदिर परिसरात ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. महिला, पुरुष, युवक तसेच लहान मुलांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.या पवित्र दिनाचे औचित्य साधून नागरिकांच्या सेवेसाठी पानपोईचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई येथील कामगार उपायुक्त राजेश आडे आणि गणपती संस्थान खेडच्या सौ. नीताताई आडे यांच्या हस्ते या पानपोईचा शुभारंभ करण्यात आला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत करत कौतुक व्यक्त केले.

कार्यक्रमाला गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यामध्ये संतोष जयस्वाल, दिलीप नागापूरे, विजय सोळंके, गणेश एकंडवार, अविनाश ढाकूलकार, गजानन ईरतकर, नाना चोपडे, अनिल कोळेकर, बाबाराव खोडणकर, आशिष राठोड, पिंटू धाये संजय सागानी, मधुकर वट्टमवार, बंडू चोपडे, खेमसिंग राठोड, रमेश कोरटकर, संजय नागापूरे, नंदू देशमुख, तुळशीराम कोटमकार, पांडे सर, तिलक मांडवगडे आदींसह रामनवमी उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायंकाळच्या सत्रात गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत भगवान श्रीरामांच्या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि भजन-कीर्तनांच्या सुरात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण केले. युवकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला, तर महिलांनीही उत्साहाने शोभायात्रेत भाग घेतला.उत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गावकऱ्यांनी रामनवमी उत्सव समिती तसेच प्रमुख आयोजक राजेश आडे व सौ. नीताताई आडे यांचे विशेष आभार मानले.
एकूणच, श्रीरामनवमी उत्सवामुळे जवळा गावात धार्मिक एकात्मता, भक्तीभाव आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.
إرسال تعليق