अक्षय तृतीयेला बालविवाह कराल तर होणार कडक कारवाई
जिल्हा बाल संरक्षण कक्ष व्दारे आवाहन
येत्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाकडून कडक पावले उचलली आहेत. बालविवाह लावल्यास थेट कारावासाची कारवाई करण्यात येणार आहे, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. १९ एप्रिल रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार यांनी केले आहे.
कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे किमान वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह करणे हे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत बेकायदेशीर आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून विवाहापूर्वी वधू-वरांचे वय तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविवाह हा दखलपात्र गुन्हा असून, यात केवळ पालकच नव्हे तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक तसेच बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना २ वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.
जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा निर्धार केला असून, संशयास्पद विवाहाची माहिती तत्काळ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बालविवाहाबाबत माहिती देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस विभागाचा ११२ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल.अशी माहिती जिल्हा व बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी दिली आहे.



टिप्पणी पोस्ट करा