*दिग्रस तालुक्यातील खळबळजनक घटना: १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार, १९ आठवड्यांची गरोदर*
*यवतमाळ:* दिग्रस तालुक्यातील कोळशी तांडा शिवारात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी १९ आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची डेहणी येथील रहिवासी आहे. सध्या तिचे कुटुंब कोळशी तांडा शिवारातील स्वतःच्या शेतात झोपडी करून राहते. आई-वडील मजुरीसाठी गेल्यानंतर पीडित मुलगी लहान बहिणींना सांभाळत शेतात थांबायची.
याचाच फायदा घेत शेजारी राहणारा आरोपी दिगांबर काळू जाधव याने २६ जानेवारी २०२६ रोजी पीडितेला "शेतात वानर आले आहेत, त्यांना हाकलून लावू" असे सांगून फसवले. लहान बहिणींना मोबाईलवर कार्टून लावून देऊन त्याने पीडितेला शेताशेजारील जंगलात नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला.
*धमकी देऊन वारंवार अत्याचार*
या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या आई-वडिलांना मारून जंगलात फेकून देईल अशी धमकी आरोपीने दिली होती. या भीतीपोटी पीडितेने कोणालाही काही सांगितले नाही. याचा गैरफायदा घेत आरोपीने गेल्या काही महिन्यांत आई-वडील शेतात नसताना १० ते १५ वेळा पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
*पोटदुखीमुळे प्रकार उघड*
दोन दिवसांपूर्वी पीडितेचे अचानक पोट दुखू लागल्याने आईने तिला डेहणी येथील रुग्णालयात नेले. तपासणीत ही १३ वर्षे १० महिने वयाची मुलगी १९ आठवड्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता संपूर्ण प्रकार समोर आला.
*गुन्हा दाखल, तपास सुरू*
पीडितेची प्रकृती पाहता तिला तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलीस ठाण्याच्या पथकाने रुग्णालयात जाऊन पीडितेच्या आईच्या समक्ष जबाब नोंदवला.आरोपी दिगांबर काळू जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(m), ६४(२)(l), ६५(१), ३५१(२), ३५१(३) तसेच पोक्सो कायदा २०१२ चे कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.या घटनेमुळे कोळशी तांडा परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा