यवतमाळ हर घर बचत, हर घर आरडी खाते
टपाल विभागाची विशेष जनजागृती मोहीम
भारतीय टपाल विभागातर्फे विविध बचत योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ‘हर घर बचत, हर घर आरडी खाते’ हे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ही मोहीम १६ ते १८ मार्च या कालावधीत संपूर्ण जिल्हयात राबविण्यात येणार आहे.भारतीय टपाल विभागामार्फत नागरिकांसाठी सेव्हिंग बँक खाते, आवर्ती ठेव (आरडी) खाते, सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), जेष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र तसेच जीवन विमा योजना अशा विविध बचत योजना उपलब्ध करून देण्यात येतात. आकर्षक व्याजदर, पूर्ण सुरक्षितता आणि गाव-खेड्यांपर्यंत उपलब्ध सेवा यामुळे नागरिकांचा टपाल विभागावर मोठा विश्वास असल्याचे दिसून येते.
या विशेष मोहिमेअंतर्गत डाक विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना आवर्ती ठेव (आरडी) खात्याबाबत माहिती देणार आहेत. तसेच खाते उघडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्यही केले जाणार आहे.चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ४६ हजार ३५० खातेदारांनी आवर्ती ठेव योजनेचा लाभ घेतला आहे. ही योजना पाच वर्षांची असून दरमहा किमान १०० रुपये जमा केल्यास मुदतपूर्तीनंतर अंदाजे ७ हजार १३८ रुपये मिळतात.या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रत्येक कुटुंबामध्ये नियमित बचतीची सवय निर्माण करणे आणि आर्थिक सुरक्षिततेचा पाया मजबूत करणे हा आहे.
टपाल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या या अभिनव उपक्रमात सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि प्रत्येक कुटुंबात आवर्ती ठेव (आरडी) खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यवतमाळ विभागाचे अधीक्षक डाकघर मोहन निकम यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा