दान दिल्याने कमी होत नाही – महंत सांवरिया महाराज
आर्णी येथे शिवमहापुराण कथेच्या मंडपाचे भूमिपूजन संतांच्या उपस्थितीत संपन्न
आर्णी : प्रतिनिधी
आर्णी येथे लवकरच जगप्रसिद्ध शिवकथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा (सीहोर वाले) यांच्या ओजस्वी वाणीतून होणाऱ्या श्री महाशिवपुराण कथेच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या भव्य कथा मंडपाचे भूमिपूजन परमपूज्य संतांच्या पवित्र सान्निध्यात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले.यावेळी बालाजी मंदिर संस्थान, यवतमाळ येथील महंत पूज्य सांवरिया बाबा महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “दान दिल्याने कधीच कमी होत नाही. उलट दानामुळे पुण्यप्राप्ती होते. इतका मोठा धार्मिक सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी सढळ हाताने सहकार्य करावे.” तसेच आर्णीकरांना एवढ्या मोठ्या पवित्र कार्यासाठी परमात्म्याने निवडल्याचेही त्यांनी सांगितले.
आर्णी येथे दि. ३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यान माहूर रोडवरील श्री बहिरमदेव परिसरात श्री बहिरमदेव महाशिवपुराण सेवा समिती, आर्णी यांच्या वतीने पंडित प्रदीपजी मिश्रा (सीहोर वाले) यांच्या मुखारविंदातून महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास
• महंत सांवरिया महाराज (बालाजी मंदिर, यवतमाळ)
• प.पू. डॉ. धनेश्वर उपाख्य योगी श्याम भारतीजी महाराज (माहूर)
• श्री श्री १००८ महंत डॉ. ज्ञानेश्वर भारतीजी महाराज उपाख्य बाळू महाराज काकाणी (माहूर)
• महंत जितेंद्र महाराज (पोहरादेवी)
• संत अंबिका माता (बोपापूर)
• महंत योगेश पुरी महाराज (जांब)
• ह.भ.प. गजाननजी केंद्रे महाराज (आर्णी)
• प्रियदर्शनजी भारती (आर्णी)
• डॉ. सिद्धार्थजी भारती (यवतमाळ)
यांची प्रमुख उपस्थिती होती.
भूमिपूजनानंतर पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कथा-कीर्तनामुळे जीवनात सुख आणि शांती मिळते. पैसा खर्च करूनही जे आत्मिक समाधान मिळत नाही, ते आध्यात्मिक साधनेतून प्राप्त होते. त्यामुळे धर्मकार्य, प्रार्थना आणि आध्यात्माशी जोडले गेले पाहिजे.”माहूर येथील महंत श्याम महाराज यांनीही उपस्थितांना आशीर्वचन देत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत गोपाल कोठारी यांनी शिवमहापुराण कथेचे स्वरूप व आयोजनाचा आढावा मांडत कथेच्या निमित्ताने होणाऱ्या अन्नदान व सेवाकार्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करण्याचे आवाहन केले.यावेळी सकाळी पाच युगल दांपत्यांच्या हस्ते होम-हवन, अभिषेक व विधीपूर्वक कथा मंडपाचे भूमिपूजन संतांच्या उपस्थितीत करण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवमहापुराण आयोजन सहकार्य समितीचे दिलीप चिंतावर, पवन पणपालिया, शंकर मारबते, संतोष जयस्वाल, दर्शन कोषटवार, विनायक थोडगे, गोपाल कोठारी, नरसिंग जाधव, रवि नालमवार, रंजित राठोड, मुन्ना यादव, भिकू पटेल, पुरुषोत्तम इंगोले, राजेश आडे, गोपाल शर्मा, निलेश गावंडे, राजेश माहेश्वरी, सुनील चोरडिया, राजेंद्र नालमवार, सचिन दिप्पेवार आदींसह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन राजेश माहेश्वरी यांनी केले. कार्यक्रमाला महिला व पुरुष भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा