लेक लाडकी योजना: लेकींच्या पंखांना हक्काचे बळ!
महाराष्ट्र शासनाने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी 'लेक लाडकी योजना' सुरू केली आहे. या योजनेद्वारे मुलीच्या जन्मापासून ती १८ वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. बऱ्याचदा आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे किंवा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. हीच दरी सांधण्यासाठी सरकारने पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांसाठी ही योजना आखली आहे. ही योजना राज्यातील प्रत्येक मुलीला सन्मानाने जगण्यासाठी आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक भक्कम आधार ठरत आहे.
✅ योजनेचे टप्पे
या योजनेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ही रक्कम एकाच वेळी न देता, मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यामध्ये दिली जाते. त्यानुसार मुलीचा जन्म झाल्यावर कुटुंबावर आर्थिक भार पडू नये, म्हणून पहिल्या टप्प्यात ५ हजार रुपये दिले जातात. दुसऱ्या टप्प्यात मुलगी जेव्हा पहिलीत प्रवेश घेते, तेव्हा शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ६ हजार रुपये दिले जातात. तिसऱ्या टप्प्यात मुलगी सहावीत पोहोचल्यावर तिला ७ हजार रुपयांची मदत मिळते. चौथ्या टप्प्यात अकरावीत प्रवेश घेतल्यावर पुढील अभ्यासक्रमासाठी ८ हजार रुपये दिले जातात.पाचव्या टप्प्यात मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला एकरकमी ७५ हजार रुपये मिळतात, ज्याचा उपयोग ती तिच्या उच्च शिक्षणासाठी किंवा स्वतःसाठी वापर करु शकणार आहे..
✅ सामाजिक परिवर्तनाचे साधन
लेक लाडकी योजना' केवळ पैशांचे वाटप करत नाही, तर ती समाजाची मानसिकता बदलण्याचे काम करत असून सामाजिक परिवर्तनाचे साधनही ठरत आहे. यासोबतच लेकीच्या पंखांना नवे बळ देणारी योजना म्हणून उदयास येत आहे.
✅ योजनेचा लाभ कसा घ्यावा?
ही योजना अत्यंत पारदर्शकपणे गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या योजनेसाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक पात्र आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा