खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली."
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला दिग्रस-दारव्हा रोडवरील साखरा गावाजवळ अपघात झाला. एका भरधाव टीप्परने त्यांच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात खासदार देशमुख यांच्या मानेला किरकोळ दुखापत झाली असून, ते सुदैवाने सुखरूप आहेत.
खासदार संजय देशमुख हे साखरा येथे स्वर्गवासी माजी जिल्हा परिषद सदस्या सुमनताई राठोड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी गेले होते. तेथून चिंचोलीकडे मार्गस्थ होत असताना, 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एका भरधाव टीप्परने गाडी क्रमांक: MH 40 BG 6403 खासदारांच्या गाडी क्रमांक: MH 29 BV 0333) या वाहनाला मागून जोरदार धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की, खासदारांच्या गाडीच्या पाठीमागच्या भागाचा चक्काचूर झाला असून काचा फुटल्या आहेत.
या धक्क्यामुळे खासदार देशमुख यांच्या मानेला किरकोळ दुखापत झाली. अपघाताची बातमी समजताच मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते आणि सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, त्यांना कोणतीही गंभीर इजा झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
चौकट
आज झालेल्या अपघात माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.सर्व सुरक्षित असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही - संजय देशमुख ,खासदार( यवतमाळ- वाशिम)




टिप्पणी पोस्ट करा