गहू भिजल्याप्रकरणी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन
राजेश आडे यांच्या निवेदनानंतर आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीची तात्काळ दखल
आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार
आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा गहू भिजून नुकसान झाल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी प्रतिनिधी राजेश आडे यांनी केलेल्या निवेदनाची बाजार समिती प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विशाल ब. सुराडे यांनी अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०४ व ०५ मे २०२६ रोजी बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गहू विक्रीसाठी आणण्यात आला होता. मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा गहू भिजला व नुकसान झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने राजेश आडे यांनी बाजार समितीकडे निवेदन सादर करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत, भरपाई व संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
या निवेदनाची दखल घेत सचिव विशाल सुराडे यांनी मा. कामगार उपआयुक्त, आर्णी यांना पत्र पाठवून सदर प्रकरणी समितीमार्फत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. भिजलेल्या गव्हाचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मालाचे मूल्यांकन करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बाजार समितीच्या आवारात शेड व्यवस्था, सुरक्षित साठवण सुविधा आणि पावसापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सचिवांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गहू भिजल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांना योग्य ती मदत व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.



टिप्पणी पोस्ट करा